पारिजाताचे फुल
हातात पारिजाताचे फुल घेवून जेंव्हा तू मुठ झाकलीस
मला माहित होते ते फुल कोमेजेल.
पण मी काहीच बोलले नाही,
कारण मला वाटले कधी न कधी तुझे तुलाच ते उमजेल.
तू ती मुठ उघडूच नयेस असं वारंवार वाटत होतं.
कारण त्या फुलाचं कोमेजलेलं मन,
निदान तुझ्या हातात तरी पहायचं नव्हतं.
आज ह्या गोष्टीला अनेक वर्षे लोटली.
रेशीमबंधांचे रुपांतर दोरखंडात झालेय.
तुझ्या हातात फुलाचं कोमेजण मनाला स्पर्शत नाही;
वठलेला पारिजात केंव्हाच उन्मळून पडलाय.
मला कळतंय, तुला ते फुल सांभाळायचं होतं
अजाणता तुझ्या कडून ते कोमेजल.
माझं मन कदाचित तू तेंव्हाच वाचलं असशील
पण दुर्दैव, फार उशिरा तुला ते समजलं.
एकाच वाक्याचे किती वेग-वेगळे अर्थ लावता येतात, नाही का? म्हणजे जेंव्हा एखादा कवी आपली कल्पना मांडतो किंवा एखादा चित्रकार चित्र काढतो, तेंव्हा त्याच्या मनात जो अर्थ त्या कल्पनेचा असतो, पाहणाऱ्या प्रत्येकाला तो तसाच दिसतो असे नाही. उलट प्रत्येक माणूस आपल्या मानाने त्या कल्पनेचा अर्थ काढत असतो. फार वर्षांपूर्वी मी एक कविता लिहिली होती. माझ्या मते ती कविता अव्यक्त प्रेमाची होती. म्हणजे मुलीला मुलगा आवडतो पण ती सांगत नाही. पुढे दोघही आपापल्या दिशांना निघून जातात. बऱ्याच वर्षांनी मुलगा मुलीला परत भेटतो आणि आपल्या एके काळाच्या प्रेमाची कबुली देतो. पण मुलगी त्या भावनांच्या पलीकडे गेलेली असते. अशी माझी आपली साधी, सोप्पी, सरळ कविता होती. ह्या कवितेतून दुसरा कुठला अर्थ निघू शकतो ह्याची मला काडीमात्रही कल्पना नव्हती. जेंव्हा पहिल्यांदा मी ही कविता आमच्या एका सरांना म्हणून दाखवली तेंव्हा त्यांच्या मते ही कविता एका प्रेमविवाह झालेल्या जोडप्याची होती. "अकेले हम अकेले तुम" सारखी. म्हणजे नवीन लग्न झाल्यावर बायकोला नवऱ्याचा आधार वाटतो. त्याची मुठ तिला सांभाळण्याची धडपड वाटते. काही वर्षांनी तीच मुठ म्हणजे तिच्या झेपेवर पहारा वाटतो. त्याला तिला सांभाळायचे असते आणि तिला भरारी घ्यायची असते. काळजी आणि घुसमट ह्यातील रेषा तो कधी पार करतो, दोघानाही समजत नाही. दोघंही आपल्या परीने बरोबर असतात आणि समोरच्याच्या नजरेत दोषी. मला दोन्ही अर्थ आवडतात. शेवटी कवीने आपली लेखणी मांडायची. अर्थ काढणे वाचकावर सोडून द्यायचे. because beauty lies in the eyes of beholder. नाही का?